Marathi Horror-Love Story स्पर्श हवा

रात्री दहा वाजता भेटण्याची वेळ त्यांची निश्चित झाली. हवेत तरंगल्यासारखं, मोरपीस अंगावरून फिरल्यासारखं, थोडंसं घाबरल्यासारखं, काहीतरी जिंकल्यासारखं, हे सगळं एकाच वेळी अस्मितला वाटत होतं. कधी एकदा दहा वाजणार आणि पहिल्यांदा जुहीला भेटणार असं झालं होतं. कॉलेज पासून जवळच एक छोटंसं हॉटेल होतं, तिथं दोघेजण भेटणार होते. हे सगळं कुणाला न कळू देता अस्मितने भेटण्याचे ठरवले.
जुहीची ओळख एका प्रायवेट लायब्ररीजवळ झाली होती. लायब्ररी बंद झाल्यावर अस्मित कॉलेजला परतत असताना ती काही पुस्तके जमा करायला आली होती. तिनं विचारायच्या आत अस्मितने सांगून टाकलं की लायब्ररी बंद झाली आहे, उद्या सकाळी पुस्तके जमा कर. तिनं काही वेळ थांबून त्याच्याकडे बघून तिची दोन पुस्तके त्याला दिली आणि म्हणाली, “तू ही जमा करशील?” अस्मितने पटकन होकार दिला. जुहीने सांगितले की ती चार दिवस येऊ शकणार नव्हती आणि चार दिवसानंतर आपण याच लायाब्ररीत भेटू. दोघेही आपापल्या दिशेने निघाले आणि थोड्याच वेळात फिल्मी सीन सारखे दोघेही थांबून वळून बघू लागले. अस्मितने आपलं नाव सांगून, जुहीचं नाव विचरलं. दोघांची ओळख झाली. एक दोन वेळा भेट होऊन त्यांची चांगलीच मैत्री झाली होती आणि भरपूर दिवसातून आज ते भेटणार होते.
ठरल्याप्रमाणे संध्याकाळी दहा वाजता अस्मित त्या हॉटेल जवळ आला, हॉटेल बंद होतं, आजूबाजूला कुणी दिसत नवतं, जुहीपण. तिनं हीच जागा का निवडली असा प्रश्न अस्मितच्या मनात होता. दहा मिनिटं झाली अजून जुही आली नव्हती. आता फक्त पाच मिनिटं वाट बघून परत जाणार असं म्हणताच पिंक ड्रेसमध्ये समोर येऊन उभी राहिलीपण. तिनं उशिरा येण्याच कारणं सांगायला चालू केलं पण त्याचं लक्ष्य फक्त तिच्या सौंदर्याकडे होतं. या अंधारातही तिचे डोळे चमकत होते. दोन चार वाक्य बोलून झाल्यानंतर तिचं गोड हसणं मनाला भुरळ घालत होतं. वाऱ्याच्या झुळकेने हलकेसे केस तिच्या गालावर रुळत होते, मधूनच मानेला झटका देऊन केसांना त्यांची जागा दाखवत होती, त्यातूनही केस ऐकत नव्हते तेव्हा उजव्या हाताने त्यांना उचलून पाठीवर टाकून देत होती, एक मस्त असा सुगंध तिच्या चोहो बाजूनी दरवळत होता. अस्मितला भानच राहिलं नव्हतं, बघतच राहिला. जुहीनं भानावर आणलं आणि म्हणाली अरे इथ कुणीच नाही दिसत, हॉटेलपण बंद झालंय, आपण जवळच्या गार्डनमध्ये बसुया. लगेचच दोघेजण गार्डनमध्ये जाऊन बसले. जुही एक fashion designing ची student होती. जवळच तिचं कॉलेज होतं. अस्मित art & design चा student होता. त्याचही कॉलेज थोड्या अंतरावर होतं. दोघांचंही बोलनं बराच वेळ चालू होतं. आता परत जायची वेळ आली होती. अस्मित म्हणाला उद्या याच ठिकाणी आपण भेटूया, जुहीने लगेच होकार दिला, अस्मितने शेकह्यांड साठी हात पुढे केला, जुहीने शेकह्यांड न करता बाय केलं. अस्मित थोडासा ऑक्वर्ड होऊन चालू लागला. होस्टेलच्या दिशेनं चालत गेला.
दुसरा दिवस, दोघंही भेटीसाठी आतुर. अस्मित ठरलेल्या वेळेत त्या गार्डन जवळ पोहोचला. पंधरा मिनिटं वाट बघितली पण जुही अजून आली नव्हती. चक्क दोन तास वाट बघितली पण जुही आली नाही. अस्मित रागारागाने निघून गेला. तिसऱ्या दिवशी जुही वेळेत येऊन थांबली पण अस्मित कुठेच दिसत नव्हता. बराच वेळ थांबली पण तो काही आला नाही. पुढच्या दिवशी जुहीला राहवेना तिनं लायब्ररीला भेट दिली, तिथे आला नाही. त्या हॉटेल जवळ जाऊन रात्री जरा वेळ आजूबाजूचा परिसर बघितला, अचानक हॉटेलच्या भिंतीजवळ कुणीतरी असल्याचा भास झाला, हॉटेल बंद असल्यामुळे तेवढा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. जुही मोठ्या धाडसानं तिथं पोहोचली, लपलेला अस्मित गार्डनच्या दिशेने पळू लागला. जुहीनं मोठी किंकाळी फोडली “अस्मिSSSSSSSSSSSSSत!!”
त्याचा पाठलाग करत ती गार्डनपर्यंत पोहोचली. तो तिला कुठेच दिसत नव्हता. खूप शोधलं आणि कंटाळून शेवटी ती आपल्या होस्टेलवर निघून गेली. तिला सतत वाटत होतं की काल शेकह्यांड केलं नाही म्हणून रागावला असेल. सकाळी ब्रेकफास्ट साठी जुही जवळच्या हॉटेलला गेल्यावर तिथल्या मुलींचा विषय चालू होता की इथं आसपास अतृप्त आत्मा भटकत आहे आणि मुलींना प्रेमाचे नाटक करून स्पर्श करायला बघतो, त्याचा स्पर्श झाला की त्या मुली त्याच्या फेऱ्यात अडकतात. असा आतापर्यंत दोन मुलीना अनुभव आला आहे. आता त्या इथं राहतपण नाहीत. एवढं ऐकून जुही ताडकन जागेवरून उठली पहिल्यांदा लायब्ररीत जाऊन अस्मित नावाचा मेम्बर आहे का लिस्टमध्ये चेक केलं, त्या नावाच कुणीच नव्हतं. ती दोन पुस्तके जमा केली का बघितलं पण जमाच नव्हती. तिचा विश्वासच बसेना. तिथून त्यानं सांगितलेल्या कॉलेजमध्ये चौकशी केली पण तिथंही काहीच हाताला लागलं नाही…..

6 Comments

  1. Mastch Javir Sir,.
    मधूनच मानेला झटका देऊन केसांना त्यांची जागा दाखवत होती, त्यातूनही केस ऐकत नव्हते तेव्हा उजव्या हाताने त्यांना उचलून पाठीवर टाकून देत होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *