Marathi Horror Story – काळोखातला फेरा

चारी बाजूनी लख्ख काळोख पसरला होता, आकाशात चंद्र नसतो तेव्हा त्याच्या प्रकाशाची किंमत समजते, माझ्या श्वासाचा आवाज मलाच येत होता. पावलांचा आवाजही मलाच भीती घालत होता, कानात जीव एकवटला होता, डोळ्याच्या पापण्यांना ताण देऊन त्यांना मिटण्याची कमी संधी देत होतो, मागे वळून पहायची भीती वाटत होती, हातापायातून शक्ती गेल्यासारखं वाटत होत, तरीही सगळी शक्ती एकवटून झपाझप चालत होतो, डोंगराच्या कडेन तसाच अंदाचे रस्ता काढत होतो, वाटत होत या क्षणी कुणी भेटले तर बर होईल.

वाटायला लागल कि, उगाचच सर्वे करायला होकार दिला आणि इथपर्यंत आलो. माझा ड्रायव्हर मला इथल्या फार्म हाउस वर सोडून गेला. माझा assistant सकाळी येणार होता.एकट्याने राहण्याचे धाडस केले होते. रात्रीचा परिसर कसा आहे बघायला बाहेर पडलो आणि यात अडकलो. फिरत फिरत बरयाच लांब आलो होतो. एक रिस्क घ्यायची आणि थरार अनुभायाचे खुमखुमी अंगात होती. नको त्या ठिकाणी धाडस दाखवू नये.

लांबून कर्कश् आवाज येत होता, जसजशी आवाजाची लहर माझ्यापर्यंत येत होती, तसा आवजानिशी झर्रकन अंगावर काटा येत होता. आजूबाजूच्या झाडीत रातकिड्यांची कान बधीर करण्याजोगी किरर्र चालू होती. शंभर एक पाऊल पुढे गेल्यावर एका मोठ्या झाडामागून सतत एकच आवाज ऐकू येत होत, “रात्र आमची, दिवस तुमचा, रात्र आमची, दिवस तुमचा”. घोगरा आणि पहाडी आवाज, त्यासोबत दगडावर काठी आपटल्या सारखा आवाज, कुणीतरी मागे ओढत असल्याचा भास हे सगळ सहन न झाल्याने माझ्या घशातून  आपोआपच आवाज आला, “वाचवा, वाचवा”. तेवढ्यात त्या झाडामागून एक बलाढ्य असा माणूस समोर येऊन उभा ठाकला. हाताच्या मुठी आवळल्या गेल्या पण हात काय उठत नव्हता. त्यान माझ्याकडे बघून हास्य केलं. त्याच्या हास्याचा अर्थ होता कि तुझी आता सूटका नाही. त्या आकृती कडे बघायला नको वाटत होत. सहा फूट उंच, केस आणि दाढी वाढलेली, हसला कि समोरचे मोठे वेडेवाकडे दात दिसायचे, मोठे विस्फारलेले डोळे, कण्हत असलेल्या आवाजात माझ्यासमोर उभा राहून हाताने हावभाव करत होता. मला काहीच कळायला मार्ग नवता. दोन पावले मागे जाऊन मी पळत सुटलो त्यान माझा पाठलाग चालू केला, माझ्या जेव्हा दोन ढेंगा पडत तेव्हा त्याची एक ढेंग पडायची. तावडीतून सूटका होणार नवती, पण जीवाच्या आकांताने पळत होतो. त्यान आवाज द्यायला चालू केलं, “थांब पळू नको, मी नाही काय करणार” मागे वळून बघितलं तर, गायब!…… बर झाल म्हणून अजून पळू लागलो तर समोर निमुळत्या वाटेवर हात पसरून उभा! जोरात ओरडला, “तू कोण आहेस? इथे काय करतोस?” त्याला मी लहान मुलासारखं एका दमात सांगितलं. त्यान माझा हात पकडला आणि म्हणाला, “साहेब इथ असं फिरायचं नसतंय हा माझा इलाका आहे, मी इथली राखण करतो, जागा तशी चांगली नाही पण मला त्याच काय वाटत नाही. या मी तुम्हाला रस्ता दाखवतो”.

मनात नसताना पण मी त्याच्या पाठीमागे चाललो होतो. हळू हळू एक टेकडी उतरू लागलो. एका पान्दीतून रस्ता काढत त्या माणसाने मला प्रश्न केला, “तुमी बाहेर गावचे आहात काय?”,

मी: होय,

तो: मी इथ फक्त रात्रीचा फिरतो. मी हंबीरराव पैलवान. इथल्या लोकांनी मला खूप त्रास दिलाय. आता मी त्यांना सोडणार नाही. पण गावातली लोकं आता माझ्याकडे यायचं धाडस पण करत नाहीत. मला चोर समजत होते सगळे. इमानान  पैल्वानकी करत गावाच्या बाजूला राहत होतो. माझी ताकद खुपत होती, डोळ्यात त्यांच्या. गावातल्या काही महाठकानी चोरीचा डाव रचून आळ माझ्यावर आणला. कुणी ऐकत नव्हत माझं. सगळ्यांनी मिळून माझ्यावर हल्ला चढवला. लय राग आहे मनात पण काय करणार…

मी: मग तू पोलिसांना का नाही सांगितले? केस का नाही केली?

तो: आता माझं कोण ऐकणार? मीच निकाल लावणार सगळ्यांचा.

तेवढ्यात समोरून एक जंगली कुत्रा अंगावर धावून आला, हम्बीररावन एका बुक्कीत कुत्र्याचा जीव घालवला. सगळी कुत्री विचित्र आवाजात ओरडत होती. आकाशात थोडसं चांदन आल होत. मला अंधुकसा काही अंतरावर फार्म हाउस दिसत होता. जीवात जीव आला.

मी: जवळ आलो आपण!

तो: जावा आता, इकडे जास्त थांबायचं नाही.

एवढ बोलून तो निघून गेला. काही क्षणात तो अंधारात विरघळला. मी कसबस उरलेली रात्र काढली. सकाळी गावात जाऊन चौकशी केल्यावर लोकांनी मला सांगितले, हंबीरराव पैलवनाचा दहा वर्षापूर्वी खून झाला आहे, तो चोर होता, चांगला नव्हता.

 

17 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *