Marathi Horror Story-विश्रामगृहातील मुक्काम

आजचा मुक्काम सरकारी विश्रामगृहात. चार-पाच प्रशस्त रूम्स होत्या, गावाबाहेर शांत ठिकाणी असल्याने कशाचा गोंगाट नव्हता म्हणून आज मस्त झोप लागणार होती. शेवटच्या रूम मध्ये चांगली झोपण्याची व्यवस्था असल्याने मी तिथेच आराम करायचा ठरवलं. कामाचा एवढा प्रचंड कंटाळा आला होता की पडल्या पडल्या झोप लागली.
लाईट गेली, अंधुक दिसायला लागलं, अंगावरची चादर पायापर्यंत सरकत गेली, अंगाला गार स्पर्श लागला, त्या दिशेने उजव्या हाताने जोरात झटका दिला, हात हवेतच फिरून आला. छातीत धडधड वाढू लागली, घसा कोरडा पडत चालला, सगळ्या अंगाला घाम फुटला, एकाच लाकडी खिडकीची झडप कर्रकर्र आवाज करू लागली. मी तर झोपताना सगळ्या खिडक्या बंद केल्या होत्या पण ती उघडली कशी? सरकलेली चादर अंगावर घेण्याचेपण धाडस नव्हते. कशाचातर बारीकसा आवाज येत होता पण त्या आवाजावर लक्ष केंद्रित करायला नको वाटत होतं त्यामुळे नीटसं समजत नव्हतं. मी डोळे मिटूनच उठण्याचा प्रयत्न केला, माझ्या दिशेने बाहेरील रूम मधून खाडकन रिकामा पाण्याचा ग्लास फेकला आणि मला जाग येऊन मी पटकन उठलो.

नाईट ल्यांप चालूच होता, पायात खरंच ग्लास पडला होता, खिडकी उघडी राहिली होती आणि त्यातून गार वारा येत होता. ग्लास मी या रूममध्ये आणलेलं आठवत नाही. बहुतेक वाऱ्याने तो पडला असावा. तीन नंबर रूममध्ये एका पाण्याच्या मडक्यावर ठेवला होता. पडलेलं स्वप्न हे अर्ध खरं वाटत होतं. थोडसं घाबरल्यासारखं झालं म्हणून मी गेटवरून फिरून यायचा विचार केला. आता तर फक्त अकरा वाजलेत. कडी लाऊन विश्रामगृहाबाहेर पडलो, दोनेकशे मीटर अंतरावर गेट होतं. गेटवर एक वाचमन होता. त्यानं मला विचारला साहेब झोप लागत नाही का? मी त्याला म्हणालो झोप लागते पण मी सहज फिरायला आलो होतो. तुझी ड्यूटी कधीपासून कधीपर्यंत असते? तो म्हणाला; मी रोज रात्री इथे असतो. त्याचा थोडा आधार वाटला. काहीतरी विचारायचं म्हणून मी नाव विचारलं. मेजर म्हणत्यात मला पण नाव शामराव हाय असं त्यानं अगदी मनापासून सांगितलं.

मी परत माझ्या रूम मध्ये झोपायला आलो. या कुशीवरून त्या कुशीवर होण्यातच अर्धा तास गेला, झोप लागत नव्हती. पाच नंबर रूम मध्ये मी माझ्या बेडवर झोपेची वाट बघत असता नकळत डोळा लागल्यासारखं होऊ लागलं. तीन नंबर रूममध्ये मडक्याचा आवाज, ग्लास बुडवल्याचा आवाज आणि पाणी घाटाघटा पिल्याचा आवाज येत होता. माझी बोबडी वळली आणि अंगावर चादर घेऊन ती घट्ट पायाखाली, अंगाखाली, डोक्याखाली पकडून ठेवली. माझा आवाज बाहेर जाईल म्हणून दबका श्वास घेत होतो. मनातल्या मनात पाण्याचे किती ग्लास होतात हे मी मोजत होतो. एकूण दहा ग्लास झाल्यावर ग्लास खाली पडला. मी जोरात दचकलो. तेवढ्यात जाडाभरडा आवाज त्या रूम मधून आला, “झोप लागत नाही का तुम्हाला? उठा…मला तहान लागली होती म्हणून आलो. सलग दहा ग्लास पाणी पिलो”. मी चादर बाजूला केली तर समोर मेजर शामराव!! त्याला बघून मला चक्कर आल्यासारखं झालं. पाच मिनिट काहीच सुचेना, शामराव गायब आणि मी तीन नंबर खोलीत…….. मी तर पाच मध्ये झोपलो आणि इथे कसा आलो??
नकळत माझे पाय परत पाच नंबर रूमकडे वळले, आणि बेडवर पडणार इतक्यात एक काळकुट्ट मांजर खिडकीतून उडी मारून बाहेर गेलं. थरथरत्या हातांनी खिडकी बंद करून पळत येऊन बेडवर अंग टाकलं. अलगद बेड थोडासा उचलल्यासारखा वाटू लागला. तेवढ्यात बेडखालून एक जाडजूड हात समोर आला आणि माझा पाय पकडला. चिरप्या आवाजात तू आता आमचा होणार असं म्हणत माझा पाय ओढायला चालू केलं. पाच मधून तीन मध्ये कधी आलो समजलं नाही. ओढणारी आकृती स्पष्ट दिसत नव्हती. माझ्या pant च्या खिशातून काडेपेटी काढली आणि काडी पेटवली, तसा माझा पाय सुटला. मी लगेच उभा राहून पाळायला लागलो पण एक नम्बर रुमजवळ माझे फक्त पाय जमिनीवर आपटत होते आणि हात हलत होते. पुढे सरकतच नव्हतो. पुन्हा ती विकृत आकृती माझ्याजवळ येत होती तेवढ्यात मी काडेपेटी बाहेर काढून एक काडी पेटवली तशी ती आकृती तिथच थांबली. पळत पळत गेटच्या बाहेर आलो तर तिथे शामराव नव्हता. रात्रीचे दीड वाजले असतील, मला रस्त्यावरून एक चारचाकी येताना दिसली तिला हात दाखविला. गाडी लगेच थांबली आणि मी विनंती करून गाडीत बसलो.
गाडीत दोन माझ्याच वयाचे पुरुष होते. मी सरकारी नोकर आहे, कामानिमित्त आलो होतो अशी सगळी हकीकत सांगितल्यावर पहिल्यांदा सांगितलं की तिथलं विश्रामगृह खूप वर्षे झाली बंद आहे आणि तिथल्या गेटवर ड्युटी साठी कुणीच नसतं. मला ते त्यांच्या ओळखीच्या लॉजवर घेऊन जातो म्हणाले. जाता जाता प्रश्न केला, “ एवढा सगळा अनुभव घेऊन, तुम्हाला आम्ही भूतं आहोत असं नाही वाटलं? झोप लागत नाही का तुम्हाला???”…

8 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *